‘राजघराण्याला उपोषणाला बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस’

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आजपासून मुम्बातील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे, आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय. संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, ‘माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे.’ खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आझाद मैदानावर आलेले खासदार धैर्यशील माने हे पहिलेच शिवसेना प्रतिनिधी आहेत.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. काहीही करून आजचा दिवस उलटता कामा नये. मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल.’