पुरात वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या मादितीला धावले धनुभाऊ…

केज : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली, याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे तसेच आरंबगाव येथील बालाजी सिरसाट यांचे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी निधन झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या तीनही कुटुंबियांची भेट घेऊन सोनवणे व सिरसाट परिवारांचे सांत्वन केले.

यावेळी तीनही कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश धनंजय मुंडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

या तीनही कुटुंबातील नातेवाईकांशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा करत त्यांच्या भविष्यातील निर्वाह, घरांची पडझड दुरुस्ती तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचीही ग्वाही दिली.