अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे पोहोचले शेतीच्या बांधावर

केज : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली, याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, केज तालुक्यातील उंदरी, अरणगाव आदी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी नदीकाठच्या शेतांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच लवकरच या सर्व नुकसानीची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, राजपाल लोमटे, ताराचंद शिंदे, बाळासाहेब शेप, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ शेप, सुधाकर जोगदंड, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे, यांसह कृषी आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.