कुबेरांवरील शाईफेकीचं दरेकरांकडून अप्रत्यक्ष समर्थन; तर फडणविसांनी केला निषेध व्यक्त

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या या शाई फेकीचं भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. ही संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.

दुसऱ्या बाजूला राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत.काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. ‘संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,’ असं रोटे पाटील म्हणाले.