किस तर दूरच आम्हाला कुणी मिठीही नाही मारल्या; ‘रामायण’ मालिकेतील ‘सीते’ने क्रिती सेननला झापलं

क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये ती ‘माता सीता’च्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती या व्यक्तिरेखेत छान दिसत आहे, पण अलीकडेच असे काही घडले की ती ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. कारण होते चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत.

खरं तर, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) नुकतेच मंदिराच्या आवारात क्रिती सेनॉनला भेटले, तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला मिठी मारली आणि नंतर ‘किस’ केला, हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्सनी या अभिनेत्रीला धार्मिक भावना दुखावणारी घटना म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये ‘माता सीता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) हिनेही क्रिती सेनन आणि ओम राऊतच्या या व्हिडिओवरून झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका चिखलियाने Aajtak ला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि तिने क्रिती सेनन आणि ओम राऊत यांच्या व्हिडिओंचा निषेध केला.

दीपिका चिखलीया म्हणाल्या, ‘मला वाटतं आजच्या स्टार्समध्ये एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे ते पात्रात स्वत:ला सामावून घेत नाहीत आणि त्यातील भावना समजून घेत नाहीत. त्यांच्यासाठी रामायण हा फक्त एक चित्रपट असेल. मला नाही वाटत या स्टार्सनी या चित्रपटात आपला आत्मा ओतला असेल. क्रिती ही आजच्या पिढीची अभिनेत्री आहे. आजच्या काळात एखाद्याला मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हा एक गोड हावभाव मानला जातो. तिने स्वतःला कधीच सीता मानले नसेल.’

दीपिका पुढे म्हणतात, ‘हा फक्त भावनेचा विषय आहे. मी सीताजींचे पात्र जगले आहे. पण, आजच्या अभिनेत्री याला फक्त भूमिका मानतात. चित्रपट संपल्यानंतर त्यांना काही फरक पडत नाही. आमच्या सेटबद्दल बोलायचं झालं तर आमचं नावही काढायची कोणाची हिंमत नव्हती. जेव्हा आम्ही सेटवर आमच्या पात्रात होतो तेव्हा सेटवर बरेच लोक येऊन आमच्या पाया पडत असत. तो काळ वेगळा होता.’