Jyoti Waghmare | मिठी नदीतील गाळामधील लाच, महापालिकेतील कंत्राटदारांकडून लाच मिळाल्याशिवाय तुमच्या पोटातील पाणी हलत नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आज उद्धव ठाकरेंवर केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला भीक आणि लाच म्हणणाऱ्या उबाठाला राज्यातील माताभगिनी येत्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे वाघमारे म्हणाल्या. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
वाघमारे (Jyoti Waghmare) पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना म्हणजे भावाने बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. राज्यातील 6 कोटी 11 लाख महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिण मानले आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील सावत्र भावांना प्रचंड पोटदुखी झाली आहे. रांगेत उभे राहून फॉर्म भरणाऱ्या महिलांना भिकारी म्हणणे ही कुठली संस्कृती, असा सवाल वाघमारे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बायको, लाडका मुलगा योजना राबवल्या. त्यांना लाडका भाऊ देखील मान्य नव्हता म्हणून बिंधुमाधव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही. तुम्हाला सख्या भावांचे नाते कळले नाही, त्यामुळे तुम्ही लाडकी बहिण योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे ज्योती वाघमारे यांनी ठणकावले.
उद्धव ठाकरे यांचे पुण्याच्या सभेतील भाषण पाहिले तर त्यांना तातडीने मानसोपचारांची गरज आहे, असा टोला ज्योती वाघमारे यांनी लगावला. आतापर्यंत उबाठाची भाषणे, अंगविक्षेप, हावभाव, त्यांची भाषा, एखाद्याला धमक्या देणे, सतत शिवीगाळ करणे, तू राहीन किंवा मी राहिन अशी हिंसक भाषा वापरणे हे सगळं मानसशास्त्राच्या भाषेत पॅरानॉइड स्क्रिझोफेनिया झाल्याची लक्षणं आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंवर तातडीने उपचार करावेत , असे वाघमारे म्हणाल्या.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांच्या रक्ताने शिवसेना उभी राहिली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. त्यामुळे उद्धव वाकरे यांनी आयत्या पीठावर रेघोट्या ओढल्या. उद्धवचा मतांसाठी उस्मान झाला हे बोलले तर चालेल का? बाळासाहेबांनी ज्वलंत हिंदुत्व जपले तर तुम्ही हिरवे साप गळ्यात घालून मिरवत आहात. यावेळी त्यांनी एका शेरमधून उबाठावर जोरदार टीका केली.
तुमच्या राजकारणावर आलीय जोरदार टाच,
आणि म्हणूनच तुमचा मुलगा करत होता अंबानीच्या लग्नात नाच,
जर आला असेल तुम्हाला माज
तर येत्या निवडणुकीत जनता जिरवेल तुमची खाज,
जनाची नाही तर थोडी मनाची तरी बाळगा लाज
का, आता मौल्यवान हिरवी वस्त्रे घालून तुम्ही पहायला जाणार आहात हाज! असा शेर म्हणत वाघमारे यांनी उबाठा गटावर सडकून टीका केली. त्या पुढे म्हणाल्या की संजय राऊत आणि उबाठा हे सर्कशीतले वाघ असून काँग्रेस आणि शरद पवारांच्या चाबकावर नाचण्याचे काम करत आहेत. सत्तेच्या मोहापायी शिवसेनाला पायपुसणं करण्याचे काम राऊत यांनी केले, अशी टीका वाघमारे यांनी केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप