महागाई,बेरोजगारी,शिक्षणाचे प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी राज्यात निरर्थक गोष्टींवर चर्चा; छगन भुजबळ यांचा हल्लाबोल

येवला :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून द्यायची आहे. त्यासाठी येवला मतदासंघांत सुमारे १६६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमिट्या तयार करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला मतदासंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येवला संपर्क कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, संजय बनकर, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पेहलवान, माजी पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश वाघ, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, ॲड.राहुल भालेराव, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, मुश्रीफ शेख, सुमित थोरात, संतोष राऊळ,भूषण लाघवे, शकील पटेल, सचिन सोनवणे, गणेश गवळी, भानुदास जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,राज्यात महागाई, शेती, रोजगार, शिक्षण यासह अनेक प्रश्न आपल्या समोर असताना राज्यात मात्र इतर निरर्थक विषयांना अधिक महत्व देऊन चर्चा केली जात आहे अशी टीका केली. ते म्हणाले की, राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात आहे. त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. आपल्याला राज्यघटनेवर आधारित लोकशाही हवी आहे. यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे आपल्याला या सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की,राज्यात महाविकास आघाडीकडे राज्यातील जनतेचा कल आहे. त्यामुळे निवडणूका घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक गावा गावात तसेच शहरातील प्रत्येक वार्डात आपल्या पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे. सर्व सेलाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारिणी नव्याने तयार करून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. ज्यांना काम करायचे नाही त्यांना थांबवून नवीन लोकांना संधी द्या. महिलांनी आपली कार्यकारिणी अतिशय सक्षम करून महिलांची संख्या वाढवावी. मतदासंघांतील प्रत्येक गावात कमिटी तयार करा यामध्ये सर्वांना सामावून घ्या असे सांगत आठ दिवसांनी सर्व सेलची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.