कारखान्याच्या मालकीच्या मुद्द्यावरून भाजप खासदार-शिवसेना आमदारामध्ये रंगला कलगीतुरा

सांगली – सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या माळरानावरील यशवंत साखर कारखान्याच्या (Yashwant Sugar Factory) मालकीवरून भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) हे आमने-सामने आले आहेत. या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून यामुळे जिल्ह्यातील वातावरण ऐन थंडीत चांगलेच गरम झाले आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून नागेवाडीतील यशवंत कारखान्याच्या मालकीहक्कावरून खासदार, आमदार यांच्यात संघर्ष सुरु आहे. न्यायालयीन लढाई चालू असताना आमदार बाबर यांच्याकडून कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटांना सामोरं जात असल्याचा आरोप करीत खासदार पाटील यांनी या कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर, आपणास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अनिल बाबर यांना दिला आहे.

या आरोपांना अनिल बाबर यांनी लगेच उत्तर देत हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आपली न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण खासदारांच्या तोंडी दमबाजीची भाषा शोभत नाही. जर तासगावला बोलावलं तरी आपण एकटे यायला तयार आहे. गेली चाळीस वर्षे संघर्षच करीत आलो असल्यानं, अशा दमबाजीला आपण घाबरत नाही, असे म्हणत आमदार अनिल बाबर यांनी खासदारांना आव्हान दिलं आहे.