पुणे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली; दिग्गज नेता बंडखोरीच्या तयारीत 

Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसही लवकरच त्यांच्या उमेदवारांची नावे देईल अशी चर्चा सुरू होती. आता काँग्रेसने देखील त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देण्यासाठी काँग्रेसने कसब्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे.मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याचे चित्र आहे.मटाने दिलेल्या वृत्तानुसार,  रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने ग्रीन सिग्नल दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) हे बंडखोरी करण्याचा तयारीत आहेत.

तर दुसरीकडे माजीमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. काल काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक रशीद शेख यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याने अविनाश बागवे नाराज आहेत. त्यांना पक्ष प्रवेश नको होता. तस त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवले देखील होते.

दरम्यान, पुण्यातल्या चिंचवड आणि कसबा पेठ या दोन विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने जो उमदेपणा दाखवला तसाच उमदेपणा आता महाविकास आघाडीने दाखवावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.