राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणावरून वाद; प्रशासन – मनसे आमने-सामने

ठाणे  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले होते. या भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात जाहीर सभा घेणार (Raj Thackeray rally in Thane) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी राज ठाकरेंची ठाण्यात सभा होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात ही सभा होणार आहे. यासाठी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सभेची परवानगी आणि इतर तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, ठाण्यातील सभेतून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. परंतु काही दिवसांपुर्वीच गडकरी रंगा़यतन नाट्यगृहात काव्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांसह इतर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पोलिसांना सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवावी लागणार आहे. शिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील दोन अन्य ठिकाणांचे पर्याय सुचविले आहेत. मात्र ते पर्याय मनसेच्या स्थानिक नेत्यांना मान्य नसून त्यांनी मुस चौकातच सभा घेण्याचा आग्रह धरल्याचे चित्र आहे.