दिग्विजय बागलांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण

सोलापूर : राज्यात कायद्याचा धाक उरला आहे कि नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण सत्ताधारी नेते सत्तेच्या धुंदीत आता जनतेला मारहाण करू लागल्याचे चित्र आहे. थकीत एफआरपी (FRP) मागण्यासाठी गेलेले युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. ११ डिसेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली.

उसाची थकीत एफआरपीची मागणी करण्यासाठी युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे हे मकाई साखर कारखान्यावर गेले होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी रणदिवे यांच्यावर हात उचलला. त्यावेळी उपस्थितांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले. दिग्विजय बागल हे शिवसेना नेत्या रश्मी बागल यांचे बंधू आहेत.

विशेष म्हणजे एका व्हिडीओमध्ये बगल हे स्वभिमानीच्या नेत्यांवर हात उचलताना दिसत असूनही मी कोणालाही मारहाण केली नाही, असे सांगत माझ्या विरोधकांकडून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने या लोकांना कारखान्यावर पाठवले होते, असे कारखान्याचे अध्यक्ष बागल यांनी सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झाले आहेत.