भंडारा- देशासह राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका (loksabha Vidhansabha Election 2024) एकत्र घेण्याचा विचार सुरू आहे. आता यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास आम्ही या दोन्ही निवडणूका एकत्र घेणयास सज्ज असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी सांगितले आहे.
देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आले होते. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास आयोग सज्ज आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे याला उत्तर दिले असून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशपांडे म्हणाले, कुठलीही निवडणूक ही महिनाभरात होत नाही. तयारीसाठी त्याला मोठा अवधी मिळत असतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी दौरा सुरू आहे. २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे, असे देशपांडे म्हणाले.