आता तुमच्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा दोन दिवसांपासून होत्या. त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने तर या अफवांचं बातम्यात रुपांतर झालं. मात्र ही भेट गणेशदर्शनाच्या निमित्ताने झालेली होती, ती राजकीय भेट नव्हती, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करुन संबंधित बातम्यांचं खंडन केलं. हेच वृत्त प्रकाशित करताना कमळाबाई आता हातघाईवर, भाजपची काँग्रेसवर वाईट नजर असा मथळा सामनामध्ये आज छापून आला आहे.

याच मथळ्यावरुन मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) चांगलेच संतापले आहेत. तुम्ही कमळाबाई म्हणता, आम्ही तुमच्या उरलेल्या सेनेला पेंग्विनसेना म्हणू का?, असा थेट सवालच त्यांनी सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही दोन्ही पक्षातील सुरूवात असून अद्याप पिक्चर बाकी असल्याचं बोलल जात आहे.

आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय हरकत नाही. मात्र, बाईमध्ये आई, ताईमध्ये कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्यातल्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही पेंग्विनसेना म्हणायचं का? असा प्रश्न शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामना वृत्तपत्रात भाजपवर कमळाबाई अशी टीका केल्याने शेलारांनी पत्र लिहित उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल उपस्थित केला आहे.