‘ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा…नीट अभ्यास करा … तयारी करा’; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश 

कल्याण-डोंबिवली – पवारसाहेबांनी जसा एक-एक माणूस बांधला तशी संघटना बांधा तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कल्याण-डोंबिवली येथे केले.तुम्ही लढण्याचे चित्र दाखवले तर पक्षही तुमच्या मागे भक्कम उभा राहील. आपल्या पक्षाची पाळंमुळं जर आपल्याला घराघरात पोहोचवायची असेल तर बुथ कमिट्या बांधल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

लोकं पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात… समोरच्याने पैसे वाटले म्हणतात …मात्र कारणे शोधण्यापेक्षा नीट अभ्यास करा… तयारी करा… हे मानणारा मी कार्यकर्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करा असेही जयंत पाटील यांनी सांगितले.कल्याण – डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे… प्रचंड उर्जा आहे त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत चांगलं यश आपल्याला मिळेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. लोकांना भाजपमुळे वाढलेली महागाई सांगा… नरेंद्र मोदीसाहेब कंपन्या कशा विकतात हे सांगा… रेल्वेचंही खासगीकरण केले जात आहे हेही लोकांना सांगा… असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

आपले हात आभाळाला लागलेले नाही. ५४ आमदारावर मी समाधानी नाही असे सांगतानाच आपण जेव्हा शंभरी गाठू तेव्हाच मला समाधान वाटेल आणि राज्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.