विकासाच्या नावाखाली बहुमोल पर्यावरणाचा ऱ्हास करू नका : नाना पटोले

मुंबई –आपल्याला समृद्ध पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे, त्याचा ऱ्हास न होऊ देता त्याचे जतन करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. आपल्या देशाला निसर्गाची देणगी लाभलेली आहे. नैसर्गिकदृष्ट्या आपला देश अत्यंत संपन्न आहे. विकासाला विरोध नाही पण विकासाच्या योजना राबवताना माणसाला केंद्रबिंदू मानून योजना केल्या पाहिजेत. माणसाच्या जीवावर उठणारा विकास काय कामाचा? विकासाच्या नावाखाली बहुमोल पर्यावरणाचा ऱ्हास करू नका, पुढच्या पिढीचा विचार करून पर्यावरणाचे रक्षण करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण सेलचा राज्यस्तरीय मेळावा आज वसई येथे पार पडला. या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष समीर वर्तक, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, रवींद्र दळवी, वसई जिल्हा प्रभारी व प्रदेश सरचिटणीस जो. जो. थॉमस, प्रा. प्रकाश सोनावणे, यशवंत हाप्पे, संदीप पांडे, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, पर्यावरणाचे महत्व ओळखून काँग्रेसने पर्यावरण सेलची स्थापन केली आहे. या विभागाचे काम राज्यात चांगल्या पद्धतीने सुरु आहे पण आणखी विस्तार झाला पाहिजे. आरेतील झाडांची कत्तल होऊ नये यासाठी आपल्या विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर आंदोलन केले, या आंदोलनाची मीडियासह समाजाने देखल घेतली. समुद्रकिनारच्या खारफुटीची जंगले पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. ती नष्ट झाली तर समुद्र किना-यावरील घरे गावे शहरे पाण्याखाली जातील. पुढचा काळ अत्यंत कठिण आहे, आपण पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर ऑक्सिजनसाठी पैसे मोजावे लागतील आणि ऑक्सिजनसाठी युद्ध होऊ शकते. पर्यावरणाची हानी म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाला आमंत्रण आहे.

यावेळी बोलताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पर्यावरण वाचले पाहिजे हे लक्षात घेऊनच काँग्रेस सरकारांनी अनेक कायदे केले आहेत. इंदिराजी गांधी पंतप्रधान असतानाही पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. पर्यावरण संपले जल जंगल सपेल ते संपले तर तर आदिवासी, शेतकरी आणि पर्यायाने मानव जातीचे अस्तित्व धोक्यात येईल. पर्यावरणाच्या या संचिताचा लाभ पुढच्या पिढीलाही घेता आला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे. विकास व पर्यावरण याचा समतोल साधता आला पाहिजे. असे लोंढे म्हणाले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा पिंपळाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.