राज ठाकरेंना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देईन, त्याची काळजी करु नका – अजित पवार 

मुंबई – मनसे मेळाव्यातील भाषणानंतर झालेल्या टीकेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर राज यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला. या सभेनंतर महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पवार घराण्याकडून झालेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले,  सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.असा घणाघात त्यांनी केला.

 अजित पवारांचे प्रत्युत्तर

मी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी आलोय. आज वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तुम्ही कुणीतरी काहीतरी बोलणार आणि त्याबद्दल विचारणार. त्यांना फार महत्व देऊ नका. माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची प्रकृती जास्त महत्वाची आहे. माझा सहकारी अॅडमिट असून त्याला भेटण्यासाठी आलोय. योग्य वेळी उत्तर देईन, त्याची काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, असं अजित पवार म्हणाले.