उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार; कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार

Mumbai – उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी(drought) तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील २ जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात ७ अघफू व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अघफू असे एकूण २३.६६ अघफू पाणी वापर आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.