मद्यधुंद व्यक्तीने केला लग्न समारंभात गोळीबार; आई आणि मुलगा जखमी 

नवी दिल्ली: टिकरी येथील कलान परिसरात एका लग्न समारंभात एका व्यक्तीने गोळीबार केला ज्यात एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

डीसीपी परमिंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० नोव्हेंबरच्या रात्री घडली. घटनास्थळी पोहोचल्यावर 24 वर्षीय सरोज आणि तिचा 6 वर्षांचा मुलगा जखमी झाल्याचे आढळून आले, त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी लग्नातील काही विधींचा कार्यक्रम सुरू होता, त्यात काही नातेवाईक गावातील मंदिरात जात होते.

ते मंदिरात पोहचत असतानाच घरात मद्यपान करत असलेला राजीव नावाचा व्यक्ती ढोल-ताशाचा आवाज ऐकून बाहेर आला आणि आनंदाने गोळीबार केला. यामध्ये सरोज आणि तिचा ६ वर्षाचा मुलगा जखमी झाले.

तपासादरम्यान आरोपी राजीव याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. तपासात समोर आले की, आरोपी राजीवला मे 2021 पासून एका खून प्रकरणात पॅरोल मिळाला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.