मनुस्मृतीमुळे भारतीय महिलांना मानाचं स्थान; न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग याचं विधान

नवी दिल्ली- भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान असतात कारण भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिलं आहे, असं विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाने केलं आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतले काही दाखलेही दिले आहेत. यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केलं आहे. सिंग म्हणाल्या की, मला खरंच वाटतं की भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचं स्थान दिलं आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही.त्यामुळे मला वाटतं की महिलांचा आदर कसा करावा हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे.

सिंग पुढे म्हणाल्या की, आशियाई राष्ट्रांमध्ये महिलांना घरी, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये आणि एकूणातच खूप मानसन्मान दिला जातो. मला वाटतं याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक शिकवण आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.