कोरोना काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा व मिडीयाने उत्कृष्ट काम केले – दत्तात्रय भरणे  

सोलापूर :- जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

येथील फडकुले सभागृहात सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या प्रशासनातील व प्रसार माध्यम स्तरावरील कोरोना योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचे आयुक्त हरीश बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, संतोष पवार, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे मनीष केत यांच्यासह अन्य अधिकारी व प्रसार माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर असताना सर्व प्रशासकीय यंत्रणा व प्रसारमाध्यमांनी उत्कृष्ट काम केले. या कामात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी ही सहकार्याची भूमिका ठेवली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यास मदत झाली. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता आपल्या जिल्ह्यात जाणवली नाही यासाठी प्रशासनाने रात्रंदिवस काम केले. जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावर वरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोलापूर जिल्ह्याची चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माहे मार्च 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणास सुरुवात झाली.त्यावेळी सोलापूर जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळालेला होता. परंतु राज्यसरावर क्रियाशील रुग्ण संख्येच्या प्रमाणात लसीचा पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आल्याने मधल्या काळात रुग्ण संख्या कमी असल्याने त्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी लसीचा साठा मिळत होता. परंतु सोलापूर जिल्ह्याचा पालक म्हणून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर लसीचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो व त्यांच्याकडून त्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी लसीचा साठा उपलब्ध करून घेतला, अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी देऊन ज्या नागरिकांनी आज पर्यंत लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तात्काळ लस घ्यावी असे आवाहन केले.

सध्या कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्याचे बोलले जात असून त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनाने ती लाट थोपवण्यासाठी यंत्रणा सज्ज करून ठेवलेली आहे. परंतु नागरिकांनीही या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी करून अर्थव्यवस्था थांबवणे कोणालाही परवडणारे नसल्याचे त्यांनी म्हटलं.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासकीय यंत्रणेला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही चांगले सहकार्य केले त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला अहोरात्र काम करून या महामारी चा प्रतिबंध करण्यासाठी मदत झाली. या काळात खाजगी डॉक्टर्स ना ओपीडी सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. मी स्वतः पीपीई किट घालून सिविल हॉस्पिटल मधील कोरोना कक्षात जाऊन रुग्णांशी संवाद साधला.तसेच रुग्णालयात आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली, असेही श्री. भरणे यांनी सांगून या काळात झालेले उत्कृष्ट काम हे सांघिक काम असल्याचे स्पष्ट केले.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ही लोकप्रतिनिधीचे सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. तसेच ही लाट थोपवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगून प्रशासनाने सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक राहिले पाहिजे. तसेच पुढील काळात सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करून सोलापूर जिल्ह्याला विकासात पुढे घेऊन जाऊ या असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. तसेच हा उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दोन्ही पत्रकार संघाचे व सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधीचे त्यांनी आभार मानले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच लातूर शहरातील सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले. कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यात लोकवर्गणीतून शंभर कोविड सेंटर चालवण्यात येत होते व असे लोकवर्गणी करून कोविड सेंटर चालवणारा सोलापूर जिल्हा राज्यात पहिला होता अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.तसेच कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रसार माध्यम प्रतिनिधींनी चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले व भविष्यातही असेच सहकार्य राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे व मनीष केत यांचेही मार्गदर्शन झाले.

प्रारंभी पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व त्यांची सर्व टीम तसेच पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता व त्यांच्या टीमचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व दैनिके व इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सर्व प्रतिनिधी यांचा कोरोना योद्धा म्हणून पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले तर आभार संतोष शिरसाट यांनी मानले.

You May Also Like