‘महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले…’

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी २९३च्या चर्चेवर बोलताना शिंदे सरकारच्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्र शासनाचे नगरविकास खाते हे शासनाच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः गेल्या ७-८ वर्षांपासून या खात्याचा कार्यभार हाकत आहेत याकडे सभागृहाचे लक्ष जयंत पाटील यांनी वेधले. नगरविकास खात्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शहर आहे. अनेकांसाठी ही मुंबई पोट भरणारी आहे, अनेकांसाठी ती घर आहे, अनेकांसाठी ती लक्ष्मी आहे, अनेकांसाठी स्वप्न आहे तर अनेकांसाठी माय आहे हेही जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.मागील मुंबई मनपा निवडणुकीत साम – दाम – दंड – भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेना मनपा निवडणुकीत चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला. खरंतर इथेच महाविकास आघाडीच्या जन्माची चाहूल लागली हा ही खुलासा जयंत पाटील यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहेत. त्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आणि पालिकेच्या तिजोरीवर  हात मारला गेला असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.मुंबई सुशोभीकरणाच्या नावाखाली तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्याचीही तोडफोड करून नवी कामे सुरू केली. गरज नाही तिथे खर्च केला जात आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

IFSC centre planned at BKC, but relocated in Gujarat

MIAL office shifted from Mumbai to Gujarat.

Air India office was in Mumbai that later shifted in Delhi

Trade mark patent office was in Mumbai & later it was shifted in Delhi.

The ship breaking activity moved from Mumbai to Gujarat.

Diamond market shifted from Mumbai to Surat.

एवढ्या गोष्टी या गुजरातकडे नेण्यात आल्या असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा टोला लगावतानाच या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

मागील २ वर्षांपासून मुंबईसह बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.या निवडणुका का होत नाही याचा अभ्यास करायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले.सरकार हे संपूर्ण राज्याचे असते. या राज्यातील नागरीक, शहर, गाव, तालुका, जिल्हा या सर्वांना शासनाने समान वागणूक द्यायची असते. मात्र इथे जरा वेगळ्या गोष्टी पहायला मिळत आहे. यासाठी जयंत पाटील यांनी MMRDA च्या माध्यमातून मुंबई कोस्टल रोड आणि ईस्टर्न फ्रीवे ला १५०० कोटी, ठाणे आणि बोरिवली ट्वीन बोगदे ३००० कोटी रुपये, ईस्टर्न एक्सप्रेस ट्राफिक सुधारणांसाठी ठाणे – तिन्हात नाक जंक्शनला १०० कोटी रुपये, MTL पुणे ते पुणे एक्सप्रेस वे ला कनेक्ट करण्यासाठी २०० कोटी रुपये, बाळकूम ते गायमुख ठाणे – दहा हजार ५०० कोटी रुपये, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वाहतूक कमी करण्यासाठी आणि विकास कामांसाठी एक हजार कोटी रुपये, JRJ माध्यम प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपये, छेडा नगर -घाटकोपर ते ठाणे फ्रीवे साठी ५०० कोटी रुपये, कल्याण बाय-पास रस्त्याचे काम दीडशे कोटी रुपये, मुंबई ट्रान्स हार्बर १५ हजार ३०० कोटी रुपये घोषित केले आहे.MMRDA ने ६० हजार कोटीचे कर्ज काढले आहे. या घोषणा करत असताना पैसा उभा कसा करणार हे आम्हाला जाणून घ्यायचे होते असेही जयंत पाटील म्हणाले.

metro-3 च्या प्रकल्पाची किंमत ही जवळपास ५० टक्केहून वाढली आहे. एकूण कॉस्ट २३ हजार १३६ कोटी होती ती आता वाढून ३७ हजार २७६ कोटी एवढी झाली आहे. एकावर्षात तब्बल ४ हजार कोटींनी वाढली आहे. या MMRDA आणि MMRCL ने कर्ज घेतले आहे ते foreign bank कडून पण घेतला आहे आणि जर डॉलरचा दर वाढला तर त्याचा परिणाम आपल्या राज्याच्या तिजोरीवर होतो. केंद्रीय वित्तमंत्री यांच्या भाषेत सांगायचे झाले तर रुपया कमजोर होत नाही आहे. डॉलर मजबूत होत आहे आणि त्या मजबुतीचा फटका आपल्याला बसत आहे. सर्व काही सुरू आहे ते काही आलबेल सुरू आहे असे मला वाटत नाही असेही जयंत पाटील म्हणाले. सर्व प्रकल्प हे कार्यक्रम करण्यासाठी आहे, इव्हेंट करण्यासाठी आहे अशी शंकाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

महेश आहेर ठाणे पालिकेचा अधिकारी आहे, सिक्कीम युनिव्हर्सिटी येथून बी.कॉम झालेला आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे. पण माहिती काढली तिथल्या उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमध्ये हे नाव नाही. ठाणे सहाय्यक आयुक्त कसा होऊ शकतो ? दहावी पास व्यक्ती ठाण्यासारख्या शहराच्या उच्चस्थानी बसत असेल, प्रशासनात बसत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे तो तिथपर्यंत कसा गेला याचा खुलासा व्हायला पाहिजे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

या महाशयांची बरीच प्रकरणे आहे. याबाबत खोलात जात नाही परंतु ज्याचा हिरानंदानीमध्ये फ्लॅट आहे त्याला प्रकल्पबाधित म्हणून लाभ मिळाला आहे. ही शंका उपस्थित करणारे आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.ठाण्यात काय सुरू आहे ?चुकीचा पायंडा पाडला जात आहे. मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस यांना हे पटेल ते हळूहळू मुख्यमंत्र्यांपर्यंतही येऊ शकते. त्यामुळे आहेर यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे होते. आज विधिमंडळातील सदस्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस याला आळा घालतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सत्ता कधीच बदलणार नाही अशा अविर्भावात अधिकारी वागत आहेत. त्यामुळे आहेरला निलंबित करा, त्यासंदर्भात समिती स्थापन करा आणि महिन्याच्या आत अहवाल सादर करून दोषी असल्यास कठोर कारवाई करा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.