India Q2 GDP Data : सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला

नवी दिल्ली : भारताच्या जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनात वर्तमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात जलद वाढ नोंदवली गेली. देशाचा जीडीपी दर एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 8.4 टक्के नोंदवला गेला असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

या कालावधीत उत्पादनात साडे पाच टक्के वाढ झाली आहे, तर बांधकाम विभागात दुसऱ्या तिमाहीत साडे सात टक्के वाढ झाली आहे.कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतही,या दुसऱ्या तिमाहीत, जुलै-सप्टेंबरमध्ये क्रयशक्ती वाढली आहे, त्यामुळे पुढील महिन्यांत ग्राहकांद्वारे मागणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची आशा आहे.

सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेने ४.९ टक्के दराने विकास साधला आहे. त्या तुलनेत या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा ८.४ टक्क्यांचा वाढीचा दर सरस ठरला आहे. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट जर आली नाही तर आणखी अर्थव्यवस्था सुधारेल अशी शक्यता आहे.

कोरोना विषाणूच्या व्यत्ययानंतर अर्थव्यवस्थेतील मागणी हळूहळू पूर्वपदावर आल्याने या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. करोनाग्रस्त २०२०-२१ आर्थिक वर्षांतील एप्रिल-जून या तिमाहीत हा दर २४.४ टक्क्यांनी आक्रसला होता. मात्र, गेल्या आर्थिक वर्षांतील पहिल्या दोन्ही तिमाहींवर करोना प्रतिबंधक देशव्यापी टाळेबंदीचे सावट होते.

हे देखील पहा