नवाब मलिकांना दणका; ईडीकडून कप्तान मलिक यांनाही समन्स जारी

मुंबई –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान,  नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन केले. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला आता नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स बजावले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडीने कप्तान मलिक यांना समन्स जारी केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे, असे एएनआयने म्हटले आहे.