‘ईडी विनाकारण अटक करत नाही, कायद्यासमोर आमदार, खासदार कोणीही मोठा नाही’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, कुठलीही तपास यंत्रणा काही संदर्भ किंवा संशय असेल तरच तपासासाठी बोलवते. त्यामुळे तपास यंत्रणेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून टीका करणे योग्य नाही. नवाब मलिकांचे काही संदर्भ किंवा तथ्य असतील तरच ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन जाऊ शकतात. असे कुणालाही वाटले किंवा कुणाच्याही दबावाखाली सूडभावनेने कारवाई होत नसते.

या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्यासमोर आमदार, खासदार कोणीही मोठा नाही. हे या ठिकाणी पुन्हा एकदा कायद्याने दाखवून दिलं आहे, कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि सत्ताधारी पक्षाला तर नाहीच नाही. जर नवाब मलिक यांचा संदर्भ ईडीच्या कुठल्या विषयात असेल तर त्याठिकाणी चौकशी करून तपासणे हा त्यांचा कामाचा भाग आहे, आणि ईडी विनाकारण अटक करत नाही. अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.