नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीला मोठे यश, हवाला व्यवहारांचे पुरावे मिळाले ?

नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मोठे यश मिळाले आहे. कोलकाता आणि मुंबईतील (Kolkata and Mumbai) झडतीदरम्यान, ईडीला काही संशयास्पद नोंदी तसेच हवाला व्यवहारांचे संकेत मिळाले आहेत. कोलकाता येथील डोटेक्स कंपनीच्या कार्यालयातून यंग इंडियाला दिलेल्या 50 लाख रुपयांच्या कर्जाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एन्ट्री बुकमध्ये सापडलेल्या हवालावरून व्यवहारांचे क्लूज  मिळाले आहेत. सध्या या सर्वांचा तपास सुरू आहे.

दुसरीकडे, काल मोठी कारवाई करत ईडीने नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले आहे. यासोबतच एजन्सीच्या परवानगीशिवाय परिसर उघडू नये, असे निर्देश ईडीने (ED) दिले आहेत. ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय उघडू नये, अशी नोटीस दिली आहे. ईडीने मंगळवारी या कार्यालयाची झडती घेतली होती, त्यानंतर ते सील करण्यात आले आहे. येथील कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी ईडीच्या पथकाने येथे छापा टाकला होता.

यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने दिल्ली, लखनौ, कोलकाता (Delhi, Lucknow, Kolkata) येथील 12 ठिकाणी छापे टाकले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैशांच्या व्यवहारांशी संबंधित अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (Money laundering) कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत छापे टाकण्यात आले. हे छापे प्रामुख्याने नॅशनल हेराल्डशी संबंधित व्यवहारात गुंतलेल्या युनिट्सवर टाकण्यात आले. या प्रकरणात नुकत्याच झालेल्या अनेक लोकांच्या चौकशीतून समोर आलेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Sonia Gandhi and Rahul Gandhi) यांची अनेक फेऱ्यांपर्यंत चौकशी केली. याचा काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला होता. सोनिया आणि राहुल यांच्या ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने केली. सोनिया गांधी यांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले होते.