वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी; पत्राचाळ घोटाळा प्रकरणी समन्स

मुंबई – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीच्या वकिलाने कोर्टात केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केलाय. त्यांनी याबाबत सेशन्स कोर्टातही कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

राऊत यांची ईडी कोठडी वाढलेली असतानाच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार असून ईडीच्या चौकशीला सामोरे जाणा`र असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं.

दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी 1 कोटी 6 लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीनं समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.