शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचे मुंबईतील चार मजली घर ईडीने केले जप्त

Mumbai – आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. पटेल यांचं मुंबईमधील वरळी येथील चार मजली घर ईडीने (Enforcement Directorate, ED) जप्त केले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इकबाल मिर्ची प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीच्या परवानगीशिवाय प्रफुल्ल पटेल यांना हे घर विकता येणार नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर ईडीने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. नवाब मलिक यांचेही नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव दाऊदशी जोडण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते  शरद पवार यांचे  पटेल हे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय नेत्यांमध्ये समावेश होतो हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे.

नेमके प्रकरण काय आहे? 

वरळी येथे सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याच्या आरोपातून मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.