अनिल परब यांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज (15 जून) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मागच्या काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान ईडीने छापा टाकल्यावर परबांची तब्बल तेरा तास चौकशी करण्यात आली होती. चौकशी संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "पर्यावरणाची दोन कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली." कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते.