नवाब मलिक यांना दणका; १४८ एकर जमिनीसह कोट्यावधींच्या मालमत्ता जप्त 

मुंबई –  मनी लाँड्रिंगसह अनेक गंभीर आरोप असणाऱ्या महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने आणखी एक मोठा दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.

ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स, कुर्ल्यातील गोवावाला कम्पाउंड येथील व्यावसायिक जागा, वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील १४८ एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच, ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या नवाब मलिक यांच्या स्वत:च्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या शिवाय या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.