Eknath Shinde | शिवसेनाप्रमुखांची शिवतीर्थावरून ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधंवानो’ ही गर्जना देशात गाजत होती. मात्र आज उबाठाला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटत आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिमंत राहिली नाही आणि हिंदुह्रदयसम्राट म्हणून बोलायला जीभ कचरु लागली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठावर गेली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मतांसाठी लाचारी करणारे आपण किती बदलू शकतो हे उबाठाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन प्रशंसा करणारे आज शिव्याशाप देत आहेत. इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणी पाहिला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, लालूप्रसाद यादव या लोकांवर हल्ला केला. पण याच शिवतीर्थावर उबाठा त्यासर्वांच्या मांडीला मांडी लावून बसले. उबाठाची थेरं पाहून बाळासाहेबांच्या मनाला नक्कीच यातना झाल्या असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारून आंदोलन केले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, काँग्रेसचे गवत उपटून टाका, पण त्याच गवतात उबाठा लोळताना दिसत आहेत, हे दुर्दैव आहे. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष काढून घेतला त्या काँग्रेसला माझ मत असे अभिमानाने उबाठा निर्लज्जपणे सांगतात. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसला साथ देऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत उबाठाने खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली.
उबाठाकडे बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही. फक्त रोज शिव्याशाप देणे एवढंच काम उरले आहे. आमच्याकडे शिवसेना तर उबाठाकडे शिव्या देणारी शिव्यासेना असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यामुळे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि उबाठाचा हात काँग्रेस के साथ हे जनतेने ओळखले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
…आणि म्हणतात माझा बाप चोरला
बिघडलेल्या पोराने चुकीचा रस्ता धरला आणि म्हणतात माझा बाप चोरला, हे बोलणे दुर्दैवी आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असून तेच घेऊन आम्ही पुढे चाललो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :