एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री? ठाण्यात बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

ठाणे – ठाण्यातील शिवसेनेचे सर्वात लोकप्रिय नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

येत्या 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर 4 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस झाला. दोघा पितापुत्रांना शुभेच्छा देणाऱ्या ठाण्यातील बॅनरची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समुळे उलटसुलट चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं. थेट बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जाऊ लागल्याने राजकीय वर्तुळातील दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत.