आता हे कुणाचा बळी द्यायला गुवाहाटीला चालले आहेत ते माहिती नाही; अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया

 मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार  पुन्हा गुवाहाटी (Shinde Group Guwahati Tour 2022) दौऱ्यावर  गेले आहेत. महाराष्ट्राचं सत्तानाट्य (Maharashtra Politcal Crisis) जिथून सुरू झालं, त्याच भूमीत परत जाऊन शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेतील.

सत्तासंघर्षावेळी शिंदे गट आमदार जिथे थांबले होते त्याच रॅडिसन ब्लूमध्ये शिंदे गटाचा मुक्काम असेल. त्यासाठी हॉटेलच्या 100 खोल्या बुक केल्याचं समजतंय. शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यासाठी कामाख्या मंदिरातली सुरक्षा वाढवण्यात आलीय. शिंदे गुवाहाटीला निघणार म्हटल्यावर जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू झालीय.

दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो, असं अजित पवार म्हणाले होते.