Eknath Shinde | काँग्रेसच्या व्होट बँकेवर उबाठा निवडणूक जिंकले. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली. मात्र काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले कसे नाहीत. त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे वारस कसे होऊ शकतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन आज वरळी येथील एनएससीआय डोम येथे दिमाखात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बालेकिल्ले आपण अबाधित राखले. ठाणे-कल्याण दोन दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकले, छत्रपती संभाजीनगर जिंकले. आपण घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि नतमस्तक होतो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण दोन वर्षापूर्वी उठाव केला. खऱ्याअर्थाने आज निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. उबाठाला हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. आजच्या मेळाव्यात हिंदु बांधव भगिनी बोलण्याचे धाडस त्यांनी केले नाही. तुमचे कसले हिंदुत्व, अशी टीका करतानाच बाळासाहेबांचे नाव घेण्याचा आणि मते मागण्याचा नैतिक अधिकार उबाठाला राहिला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांनी देशभरात नेली. मात्र मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले.
आज लोकसभेच्या ७ जागा जिंकलो आणखी ३ ते ४ जागा आपण जिंकू शकलो असतो. आपल्याला महायुती अधिक मजबूत करायची आहे. मागचे विसरुन महायुती ताकदीनं आपल्या पुढे न्यायची आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आपल्या साक्षीने ही जबाबदारी मी पार पाडीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या वावटळीत शिवसेनेचा मूळ मतदार शिफ्ट झाला नाही. तो धनुष्यबाणाकडे कायम राहिला. याचे उदाहरण म्हणजे शिवसेनेचे १९ टक्के मूळ मतदार त्यापैकी १४.५% आपल्या बाळासाहेबांच्या विचारांकडे शिवसेनेकडे आली. फक्त ४.५% मतदार तिकडे राहिले आणि इतर मतदार कुठून आले हे सर्वांना माहित अशी टीका त्यांनी केली.
मतदारांनी उबाठाचे दात घशात घातले. हा एकनाथ शिंदे संपणार नाही आणि संपला नाही तर तो जिंकला आणि पुढे जिंकत राहील. शब्दकोषात भिती, डर हा शब्द नाही. कोकणात उबाठा साफ झाला. ठाणे कल्याण पालघर, संभाजीनगर साफ झाला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप