असल्या धमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदे यांचे खणखणीत प्रत्युत्तर 

मुंबई – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटीत तळ ठोकून बसलेल्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे यांच्या बंडाळीमुळे नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट भाजप बरोबर हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाला मंत्रिपदाची ऑफर्स देण्यात आलेली आहे अशी देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, बंडखोर गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यावर रोखठोक उत्तर देत शिंदे यांनी, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, कायदा आम्हालाही कळतो, असे प्रत्यूत्तर दिले आहे. पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे काल केली होती. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्यूत्तर देत, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत (We are the real Shiv Sena and Shiv Sainik of the respected Shiv Sena chief Balasaheb Thackeray), अशी रोखठोक भाषा एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.