Eknath Shinde | उद्योगांना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्योजकांशी संवाद

Eknath Shinde  | सरकारची धोरणे, नियम, कायदे यांचा फायदा लोकांना झाला पाहिजे, हा सरकारचा हेतू आहे. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र हे रिअल इस्टेट आहे. उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. उद्योग आणि कृषीसंबधी अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी दिली. नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

नाशिक ऐतिहासिक शहर आहे. दोन वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या दृष्टीने नाशिकमध्ये विकासाला वाव आहे. त्यादृष्टीने लवकरच स्वतंत्र बैठक होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. देशभरातून लाखो लोक नाशिकमध्ये येणार आहेत. कुंभमेळाच्या आयोजनाबाबत शासन गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने शेतकऱ्याला वर्षाला ६००० आणि राज्याने ६००० असे १२००० रुपये मिळत आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिला जातोय. सरकारने नियम बाजूला सारुन शेतकऱ्यांना १५००० कोटी रुपये संकटात मदत केली. इतर योजनांमधून शेतकऱ्यांना ३५००० कोटींची मदत केली आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समृद्घी महामार्गात १८ नोड तयार केले जाणार आहेत.

महिला बचत गटांची कर्ज मर्यादा वाढवली आहे. बचत गटाच्या उत्पादनांच्या मार्केटिंग, ब्रॅंडिंगसाठी सरकार महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे, मार्केट उपलब्ध करण्याचे काम सरकारने केले आहे. नवीन संसद भवन बांधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आऱक्षण देण्याचा निर्णय घेतला. ही देशाची निवडणूक आहे. देशाला आर्थिक महासत्ता करण्याची आहे. मागील १० वर्षात एकही सुट्टी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाला लाभले असे ते म्हणाले.

जेनरिक औषधांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. ज्याप्रमाणे केंद्राने आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती ५ लाखांपर्यंत वाढवली. त्याच प्रमाणे राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना १.५ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत मर्यादा वाढवली. त्यातील अटी आणि शर्थी काढून टाकल्या असून राज्यातील १०० टक्के नागरिकांना ५ लाखांची योजना लागू होईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन वर्षात २२५ कोटींची मदत केली, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप