अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर; महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग – गेले अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळा करिता 30 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी 31 डिसेंबर रोजी होणार आहे.

या निवडणुकीकरिता उमेदवार अर्ज आज 29 नोव्हेंबर पासून ते 3 डिसेंबर पर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने भाजपा आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सचिन सावंत यांच्याकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तर नारायण राणे हे केंद्रीय मंत्री विराजमान झाल्यानंतर होणारी ही सिंधुदुर्गातील ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता असताना भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले सहा महिन्यांहून अधिक काळ रणनिती आखली जात आहे. मात्र वारंवार निवडणूक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला ताणलेली असताना आता अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.