निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा दावा 

नाशिक – लोकशाही मध्ये निवडणुकांना महत्व असून; निवडणुकांमुळेच लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई (मंत्रालय) येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांच्या आयोजित लेखक, भाषा आणि लोकशाही या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्वाती थवील, तहसीलदार प्रशांत पाटील श्रोते म्हणून उपस्थित होते.

मुख्य निवडणुक अधिकारी  देशपांडे पुढे म्हणाले, लोकशाही ही व्यापक संकल्पना असून, कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती लोकशाहीच्या संकल्पना मूर्त स्वरूपात राबविण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतात लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व अबाधित आहे, सरकारी कामकाजातील भाषा लोकशाहीला पूरक असते. लोकशाहीचे महत्व पटवून देणारे चर्चासत्रांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. असे मतही यावेळी  देशपांडे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल चर्चासत्रात म्हणाले, लोकशाही हा फक्त राजकारणाचा विषय नाही. तर लोकजीवनाचा भाग आहे. लोकशाहीचा गाभा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोकशाहीत बहुविध माध्यमांचा चर्चेसाठी वापर होणे गरजेचे आहे. पत्रकार दिप्ती राऊत आपले मत मांडतांना म्हणाल्या, पत्रकारांचे विचार हे लोकशाहीला पोषक असतात. पत्रकार नि: पक्ष राहून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी काम करत असतो. आजच्या लोकशाही प्रक्रियेत स्त्रीयांना सर्व क्षेत्रात समानसंधी मिळाली पाहिजे. पंचायतराज व्यवस्थेत स्त्रीयांना संधी मिळत आहे. मात्र साहित्य व सामाजिक जीवनात अद्याप समानता आली नाही. कुटुंब संस्थेत खऱ्या अर्थाने लोकशाही रूजली पाहिजे.

पत्रकार, अनुवादक इब्राहिम अफगाण आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले, लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तीचा वापर लेखक करत असतो. लोकशाही असल्यामुळे आज अभिव्यक्त होण्यापासून आपणास कोणी रोखू शकत नाही. जो कोणी व्यक्त होण्यासाठी बहुविध माध्यमांचा वापर करतो तो लेखक असतो.

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिीणी पंढरीनाथ म्हणाले, प्रत्येक भाषा त्यांचे संचित घेऊन येत असते. या देशात शेकडो भाषा आहेत. बहुविध माध्यमांतून व्यक्त होता येते, यात लोकशाहीचे यश सामावलेले आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्येक व्यक्तींने भूमिका घेणे आवश्यक आहे.
डॉ. दीपक पवार यांनी चर्चासत्राचे संवादक म्हणून काम पाहिले. या चर्चासत्रामध्ये शेवटी प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम झाला, त्यावेळी उपस्थितांनी आपले प्रश्न विचारले. व त्याच्या प्रश्नाचे समाधान चर्चासत्रातील सहभागी वक्त्यांनी केले. चर्चासत्रात महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.