राज्यात महाविकास आघाडी तर तालुक्यात थेट सोयरीक, गडाख-घुलेंचं जमलं !

नेवासा : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात आणखी नव्या समिकरणांची भर पडली आहे.

आज उदयन गडाख आणि निवेदिता यांचा साखरपुडा पार पडला. गडाख आणि घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबांकडून आपसात सोयरिक जुळवण्याचा ट्रेंड सध्या जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज आणखी दोन राजकीय कुटुंब नात्यामध्ये अडकल्याचे पहायला मिळाले. लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात या लग्नाची मोठी चर्चा आहे. अखेर आज उदयन आणि डॉ. निवेदिता यांचा साखरपुडा पार पडला. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून. ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

udyan gadakh

यात मुख्य म्हणजे लवकरच होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही नवी सोयरीक एका जुन्या सोयऱ्यांच्या गटाला धक्का देणारी मानली जात आहे. दरम्यान आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे आपसातील नातेसंबंधांची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. हे नातेसंबंध पुढील राजकारणाच्या दृष्टीने देखील दोन्ही कुटुंबाला फायद्याचे ठरणार असल्याचे बोलेले जात आहे.

दुसरीकडे, या नव्या नातेसंबंधांची राजकीय झलक विधान परिषद निवडणुकीत पहायला मिळेल असा अंदाज बांधला जात आहे. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांचे सोयरे असलेले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि दुसरे सोयरे कोतकर यांचे समर्थक यांची मदत घेतली जाणार आहे. शिवाय भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्डिलेंना ताकद दिल्याचे सांगण्यात येते.

या समीकरणाविरोधात आता घुले-गडाख-थोरात हे सोयरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. घुलेंना राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवायची आहे. नव्या सोयरिकीमुळे गडाखांशी संबंध, त्यातून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत जवळचे नातेसंबंध तयार होत आहेत. त्यामुळे नगरमधील सोऱ्या-धायऱ्यांच्या गटाला शेवगाव-नेवासामधील हा नवा गट शह देण्यासाठी रिंगणात उतरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

अर्थात एवढी एकच निवडणूक नव्हे तर भविष्यातही या नव्या समीकरणाचे विविध निवडणुकांवर परिणाम दिसून येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. जसा घुले यांना गडाखांचा फायदा होणार आहे तसाच गडाख यांनाही विधानसभा आणि नेवासा तालुक्यातील अन्य राजकारणासाठी घुलेंचा फायदा होणार आहे.