इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून सोमवारी (दि. १२ डिसेंबर) पाहुण्या इंग्लंडने २६ धावांनी दुसरा कसोटी सामना (England vs Pakistan) जिंकला आहे. या सामना विजयासह इंग्लंडने दिमाखात कसोटी मालिकेवरही आपले नाव कोरले आहे. यापूर्वीच्या पहिल्या कसोटी सामन्यातही यजमान पाकिस्तानला ७४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे इंग्लंडने २-० च्या फरकाने ही कसोटी मालिका जिंकली आहे.
मुल्तान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५२ षटकातच २८१ धावांवर गुंडाळला गेला होता. अबरार अहमदच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले होते. अबरारने इंग्लंडच्या ७ फलंदाजांना बाद केले होते. तसेच ३ विकेट्स घेत झहीद महमूदनेही इंग्लंडला सर्वबाद करण्यात मोलाचा वाटा दिला होता. या डावात इंग्लंडकडून फक्त ओली पोप (६० धावा) आणि बेन डकेट (६३ धावा) अर्धशतके करू शकले होते.
जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअॅप ग्रुप
प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाचीही फलंदाजी फळी खास खेळ दाखवू शकली नाही. इंग्लंडने ६२.५ षटकात २०२ धावांवरच पाकिस्तानला रोखले आणि ७९ धावांची नाममात्र आघाडी घेतली होती. या डावात इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ७९ धावा केल्या होत्या.
Another famous win for England who take an unassailable 2-0 series lead 🙌#PAKvENG | #WTC23 | https://t.co/OroPZVteRn pic.twitter.com/ciNxpvhNuF
— ICC (@ICC) December 12, 2022
दुसऱ्या डावात हॅरी ब्रूकचे शतक (१०८ धावा) आणि बेन डकेटच्या अर्धशतकाच्या (७९ धावा) जोरावर इंग्लंडचा संघ २७५ धावा फलकावर लावू शकला. अशाप्रकारे पाकिस्तानला शेवटच्या डावात विजयासाठी ३५४ धावांचे आव्हान मिळाले. मात्र पाकिस्तानचा संघ ३२८ धावांवरच सर्वबाद झाला आणि इंग्लंडने २६ धावांनी विजयश्री मिळवली.
इंग्लंडसाठी खास ठरला मालिका विजय
पाहुण्या इंग्लंडसाठी हा मालिका विजय अतिशय खास आहे. कारण इंग्लंडला १९६१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाकिस्तानात केवळ २ कसोटी सामने जिंकता आले होते. मात्र गेल्या १२ दिवसांत (१ डिसेंबर ते १२ डिसेंबर) इंग्लंडने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग २ कसोटी सामने जिंकले आहेत.