शेतकऱ्यांना अधिकाधिक सहाय्य करून पिकांना योग्य भाव मिळावा याची काळजी घ्या; मोदींचे निर्देश

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील एकंदर गहू साठा, पुरवठा आणि निर्यात इत्यादी बाबींचा आढावा घेतला. याबाबत काल नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात देशाच्या विविध भागात तापमानात मोठी वाढ झाली होती. काही भागात उष्णतेची लाट आली होती. त्याचा अन्नधान्याच्या उत्पादनावर झालेला परिणाम दर्शवणारं सादरीकरण यावेळी झालं.

देशात सध्या सुरु असलेली गव्हाच्या खरेदीची स्थिती आणि निर्यात याबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला. देशातील कृषी उत्पादनांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता, उत्पादन वाढवतानाच पिकाची गुणवत्ता आणि दर्जा याविषयीचे निकष पूर्णपणे पाळले जातील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मोदी यांनी यावेळी दिल्या.

आगामी काळात भारत हा अन्नधान्य आणि इतर कृषीजन्य उत्पादनांसाठी खात्रीशीर आणि विश्वासार्ह पुरवठादार म्हणून ओळखला जावा यासाठी हे आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना अधिकाधिक सहाय्य करावं, त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा याची काळजी घ्यावी, असंही मोदी म्हणाले.