Kanhaiya Kumar : सत्तेचे आणि सत्याचे असे दोनच प्रकारचे राजकारण आपल्या देशात आहे. सत्याच्या विचारधारेत संघर्ष भरपूर आहे. मात्र, या विचारधारेला धरुनच काम करा. सत्तेच्या राजकारणाच्या विरोधात हिंमतीने आणि विचारांनी लढून काम करायची इच्छा असेल, तेव्हाच राजकारणात या. तुम्हाला सत्तेच्या राजकारणाशी हातमिळवणी करून, आरामात आयुष्य जागता येईल. मात्र, सत्याची कास धरल्यावर तुम्हाला महात्मा गांधी, गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याची संधी मिळेल, असे स्पष्ट मत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयुआय) प्रभारी डॉ. कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी व्यक्त केले
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात ’भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर’ या विषयावरील परिसंवादात डॉ. कुमार बोलत होते. या परिसंवादात हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया, खासदार राजकुमार रोत, खासदार ड. ए. ए. रहीम सहभागी झाले होते. यावेळी कुलगुरु डॉ. आर.एम.चिटणीस व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. कन्हैय्या कुमार म्हणाले की, आपल्या देशाचे राजकारण हे विचारधारेपेक्षा जुळवाजुळवीचे झाले आहे. देशातील राजकारण्यांना राजकारण हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सप्रमाणे वाटत असून, त्यांचा ते वेळोवेळी उपयोग करून घेत आहेत. राजकारणाच्या संरचनेत दोन प्रकाराचे लोक असतात. एक म्हणजे लाभ घेणारे, तर दुसरे राजकारणापासून पिढीत झालेले. तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्ही राजकारणाचे गोडवे गाता. मात्र, त्याच राजकारणापासून तुम्हाला त्रास होत असल्यास, तुम्ही त्याच्या विरोधात उभे रहाता. भारतात समानतेची आणि वैचारिक विचारधारा फार जुनी आहे. त्यामुळे ती कोणत्याही देशापासून आयात करण्याची आवश्यकता आहे. विचारधारा नसणारे लोक आणि कुत्र्यांमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे विचारधारा नसल्यास, तुम्हाला प्रश्न विचारण्याची किंवा विरोधात लढण्याची हिंमतच आली नसती. लढाई नेहमी सत्य आणि सत्तेची राहिली आहे.