‘नबाबचा कबाब झाला…’, भाजपच्या बड्या नेत्याचा मलिकांवर निशाणा

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

ईडीच्या या कारवाई वरून आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधायला सुरवात केली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘नबाब चा कबाब झाला…’ या आशयाचे ट्विट करत बोंडे यांनी नवाब मालिकांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.