खळबळजनक : जय भीम फेम अभिनेता सुर्यावर हल्ला करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

दिल्ली : तमिळ सुपरस्टार अभिनेता सुर्या तेजचा जयभीम हा सिनेमा रिलीज होताच सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मात्र काही दिवसातच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आला. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी सिनेमामुळे निर्माण झालेला हा वाद अद्याप संपलेला नाही.

हा वाद अभिनेता सुर्या तेजला चांगलाच महागात पडला. सुर्याला अनेक धमक्यांचे फोन येत होते. पीएमकेचे जिल्हा सचिव पलानीसामी यांनी अभिनेता सुर्यावर हल्ला करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर चेन्नईच्या टी नगर येथील अभिनेता सुर्याच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पलानीसामी यांच्यावर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा देखील दाखल केला आहे.

जयभीम सिनेमा २ नोव्हेंबरला अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक करण्यात आले. मात्र या सिनेमाच्या विरोधात असलेल्या एका समूदायाने सिनेमात दाखवण्यात आलेल्या काही दृष्यांविषयी आक्षेप नोंदवत मोर्चे काढले. या गोष्टीची दखल घेत पोलिसांनी सुर्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अभिनेता सुर्याच्या टी नगर येथील घराबाहेर पाच पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

अभिनेता सुर्या आणि त्यांच्या सिनेमातील संपूर्ण टीमला एका निश्चित समूहाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सतत धमक्यांचे फोन येत आहेत. वन्नियार संगम समूहाचे प्रदेश अध्यक्षांनी अभिनेता सुर्या सह ज्योतिका आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि सिनेमाच्या टीमला एक नोटीस जारी केली ज्यात सिनेमातील काही दृश्य हटवण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे इरुलर समुदायाच्या जातीतील लोकांची माफी मागावी आणि सात दिवसांच्या आत पाच करोड रुपयांचा दंड भरावा असे म्हटले गेले आहे.

अभिनेता सुर्याने मात्र सिनेमात दाखवण्यात आलेल्या दृष्यांविषयी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सिनेमाचे निर्माते त्यांच्या स्वातंत्र्यानुसार, सिनेमाच्या माध्यमातून देऊ इच्छिणारा संदेश मी लोकांपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्टीकर सुर्याने दिले आहे. पुढे सुर्याने असे म्हटले आहे की, सिनेमातून कोणत्याही व्यक्ती आणि समुदायाचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. याबाबत सुर्याने एक ट्विट देखील केले आहे. सुर्याच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रेटींनी त्याला सपोर्ट केलाय. #westandwithsurya असा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे.