नाशिक – कालपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झालं आहे. संमेलन आणि राजकारण होणं हे सूत्र ठरलेलं आहे. यंदाही संमेलनावरुन भरपूर राजकारण झालं आहे. यात आज आणखी भर पडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये असले तरी ते 94 व्या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नाहीत.
ट्वीट करुन फडणवीसांनी ही माहिती दिली. नाशिकातील संमेलनस्थळाला कुसुमाग्रज आणि वीर सावरकरांच्या नावावरुन झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा!केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?
नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच.पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का?
असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असं फडणवीस यांनी म्हटले आहे.