निर्माते ‘दिपक राणे’ यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’त दिसणार साऊथचे प्रसिद्ध कलाकार !

टीम आझाद मराठी : मराठी सिनेमात अनेक प्रयोगशील गोष्टी घडताना दिसत आहेत. असाच एक आगळा वेगळा प्रयोग निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी सिनेमात करणार आहेत. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठीतील उत्कृष्ट कलाकार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचा संगम आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय हा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित होईल. त्यामुळे सिने रसिकांसाठी ही मेजवानीच असेल. सध्या सिनेसृष्टीत या आगामी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.

दिपक राणे यांनी आजवर ‘मी नाही हो त्यातला’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘खारी बिस्कीट’ अश्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली. तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दुहेरी’, ‘फ्रेशर्स’, ‘अंजली’, ‘दुनियादारी फिल्मी स्टाईल’ अश्या प्रसिद्ध मालिकांच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली.

सुत्रांच्या माहीतीनुसार, दिपक राणे निर्मित, या सिनेमात मराठी कलाकारांपैकी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे, अश्विनी चावरे आणि केसरी फेम अभिनेता विराट मडके दिसणार आहेत. तर दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतील लोकप्रिय ठरलेल्या ‘झिलका’ या कन्नड सिनेमातील’ मुख्य अभिनेता कविश शेट्टी, अर्जुन कापेकर, सुरेश आणि कन्नड मालिका विश्वातील ‘जोठे जोठेयाली’ फेम अभिनेत्री मेघा शेट्टी या सर्वांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करणार आहेत. शिवाय या आगामी सिनेमाचे शुटींग लवकरच सुरू होणार आहे.

निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’विषयी सांगतात, "सध्या सिनेमे ग्लोबली प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सिनेमांचा आवाका वाढत आहे. असाच एक वेगळा प्रयोग करण्यासाठी आम्ही मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कन्नड भाषेतील प्रसिद्ध कलाकारांची निवड केली. व आम्ही हा सिनेमा ग्लोबली प्रदर्शित करण्याचं ठरवलं. लवकरच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न होणार आहे तर त्याचवेळेस या सिनेमाचे शीर्षक सुद्धा जाहीर होईल.”