‘सरला एक कोटी’ने जन्माला घातली आणखी एक सरला! प्रेक्षकाने चित्रपटावरुन केलं नवजात मुलीचं नामकरण

‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडेच रंगात असताना २० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. चित्रपटातील पात्रे, चित्रपटाची कथा, त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनाला वेड लावताना दिसत आहेत.

पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचं नवीनच लग्न झालंय. आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. अशात गरीब घरातला आणि पत्त्यांचा नाद असलेला भिका थेट बायकोलाच म्हणजे, सरलाला पत्त्याच्या डावावर लावतो, अशी अनोखा अन् प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत असतानाच एका प्रेक्षकाने चित्रपट बघून भारावून जाऊन त्याच्या नवजात लेकीच नावच सरला ठेवलं आहे.

बीड जिल्ह्यातील अशोक तपसे या गृहस्थांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालं. ‘सरला एक कोटी’ चित्रपट बघून भारावून जाऊन त्यांनी आपल्या लेकीचं नाव चक्क सरला ठेवलंय. चित्रपटाच्या टीमसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून सरला एक कोटी या चित्रपटाने आणखी एक सरला जन्माला घातली आहे.

दरम्यान कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप हे कलाकार चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळतोय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करताना दिसतेय. आणखी एक बाब म्हणजे चित्रपटातले संवाद आणि पार्श्वसंगीत हे अत्यंत आकर्षित करणारे आहेत.

सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.