पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको; व्हिडिओतून व्यथा मांडत पंढरपुरातील शेतकऱ्याने जीवन संपवलं!

पंढरपूर – राज्यातील शेतकरी विविध संकटांना तोंड देत सावरण्याचा प्रयत्न करत असताना वीज तोडणी करण्याचा सपाटा सरकारकडून लावण्यात आला आहे. यातच आता सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून पंढरपूर तालुक्यात एकाने आत्महत्या केली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. वीज तोडणी, मोगलाई पद्धतीची जादा वीजबिल आकारणी या सर्वांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर करून आपलं जीवन संपवलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तालुक्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सुरज याने 2 मार्च रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध घेतले. त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सुरज जाधवने अखेरचा श्वास घेतला. सुरजने विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओत  शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही अस म्हणत सरकारला दोष देत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी बसता-उठता आपल्या प्रजेची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या शिवाजी महाराजांचे नाव घेतात मात्र सरकारचा एकंदरीत कारभार पाहता राज्यात शिवशाही नव्हे तर मोगलाई सुरु आहे का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.