‘खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे राखीव ठेवावे’

लातूर :- सोयाबीन बियाण्यांचे भाव दरवर्षी वाढत असल्याने जिल्ह्यात सोयाबीन लागवड मोठया प्रमाणात होत आहे. खरीप हंगाम -2021 साठी शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे राखीव ठेवावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

खरीप -2021 मध्ये लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 457823 हेक्टरवर पेरणी झाली होती. त्याअनुषंगाने खरीप – 2020 मध्ये कृषि विभागाकडून घरचे बियाणे राखून ठेवण्याबाबतची मोहिम मोठया प्रमाणात राबविण्यात आली होती. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचेच राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केल्यामुळे उगवणी बाबतच्या तक्रारी खरीप 2020 हंगामाच्या तुलनेत नगण्य प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या.

आपल्या जिल्हयात सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र त्यासाठी लागणारे बियाणे बाजार महाग असतात. त्याची खरेदी शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे राखून ठेवले पाहिजे. सोयाबीन ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत खरीप हंगाम 2022 करीता आपल्या जिल्हयात 446.475 लाख क्विंटल बियाणे राखून ठेवण्याचे नियोजन केले आहे,असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.