SA vs IND: अखेर विराट कोहलीचे शतक पूर्ण, ‘हा’ कारनामा करणारा भारताचा सहावा खेळाडू

केपटाउन : केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचे शतक हुकले असले तरी दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या नावावर एक अनोखे शतक केले आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानच्या आधी कोहलीने 2 झेल घेतले, तसे करताच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 100 झेल घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. कोहलीने त्याचाच सहकारी अजिंक्य रहाणेला मागे टाकले आहे. रहाणेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत क्षेत्ररक्षक म्हणून ९९ झेल घेतले आहेत.

क्षेत्ररक्षक म्हणून 100 झेल घेणारा कोहली हा भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने क्षेत्ररक्षक म्हणून कसोटीत सर्वाधिक झेल घेतले आहेत. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 210 झेल घेतले. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, ज्याने १३५ झेल घेतले आहेत.

भारताच्या सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत क्षेत्ररक्षक म्हणून 115 झेल घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीत 108 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 105 झेल घेतले आहेत.

एकीकडे विराट कोहलीने 2 वर्षांपासून आपल्या बॅटने शतक केले नाही, परंतु कॅच घेण्याच्या बाबतीत, कोहलीने शतक पूर्ण करून कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच एक अनोखा पराक्रम केला आहे.

कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम भारताच्या राहुल द्रविडच्या नावावर आहे. राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीत 210 झेल घेतले, हा एक विश्वविक्रम आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने असून त्याच्या नावावर २०५ झेल घेण्याचा विक्रम आहे. जॅक कॅलिसने त्याच्या कारकिर्दीत 200 झेल घेतले आहेत. रिकी पाँटिंगने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 196 झेल घेतले आहेत. द्रविड, महेला जयवर्धने आणि कॅलिस हे तीनच खेळाडू आहेत ज्यांनी क्षेत्ररक्षक म्हणून कसोटीत 200 किंवा त्याहून अधिक झेल घेतले आहेत.