पाच – पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला हा एक विक्रमच – शरद पवार

मुंबई : देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र बसून सर्व राजकीय पक्षांनी सामूहिक भूमिका घेण्याची गरज आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य केलेच शिवाय लखीमपूर हिंसाचारात युपी सरकारवर निशाणा साधला तर बंदमध्ये सहकार्य केलेल्या राज्यातील जनतेचे आभार मानले आणि पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

कालच्या प्रकारातून पुढचा निकाल घेण्याची आवश्यकता वाटते. यात कलेक्टिव्ह लाईन कशी घेता येईल तसेच देशातील सर्वसामान्य लोकांना एकत्रित करून सतर्क करता येईल, याचा प्रयत्न करावा लागेल असेही शरद पवार म्हणाले.

केंद्रसरकार काही इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी असेल. या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतून केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही उदाहरणे सांगायची झाल्यास, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही.

एक जबाबदार अधिकार बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते.अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच – पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला.